गोंदिया : जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने आयोजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात दिले.
श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राईस मिलर्स असोसिएशन सभागृह, गोंदिया येथे शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. हे या कार्यक्रमाचे दहावे वर्ष आहे. या कार्यक्रम समारंभास राज्यसभेचे खासदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष सचिन शेंडे, जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती दीपाताई चंद्रिकापुरे मंचावर उपस्थित होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून यात पत्रकारांची भूमिका ही महत्त्वाची आहे. सामान्य माणसांच्या अडचणी समजून त्याची वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात. राज्य शासनाकडून विविध योजनांचा लाभ पत्रकारांना देण्यात येत असून जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचे पत्रकार भवन बांधण्या संदर्भातील प्रस्तावास जिल्ह्यातील खासदार प्रफुल पटेल आणि राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने पूर्ण करता येऊ शकते, यासाठी लागणारी मदत राज्य शासनाच्या वतीने करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
खासदार राजेंद्र जैन म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला जागरूक पत्रकारितेचा वारसा लाभलेला असून सर्व इथले पत्रकार नीपक्षपातीपणे जबाबदारी पार पाडतात. हा कार्यक्रम सर्वसमावेशक असा कार्यक्रम पत्रकार संघाने आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही श्री. जैन यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नवभारत वर्तमानपत्राचे वरिष्ठ पत्रकार राधेश्याम नागपुरे यांना जीवन गौरव टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार, उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, स्व. मनोहरभाई पटेल स्मृतीनिमित्त संपादकीय पुरस्कार, स्व. स्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन स्मृतीनिमित्त उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार, स्व. संतोष अग्रवाल स्मृतीनिमित्त शोध वार्ता पुरस्कार, स्व. रामकिशोर कटकवार स्मृतीनिमित्त वृत्तवाहिनी पुरस्कार, माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले यांच्याकडून कृषिरत्न पुरस्कार, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी यांच्याकडून सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, गणेश स्टोर्स परिवार गोंदिया यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरस्कार, स्व. गोविंदभाऊ शेंडे स्मृतीनिमित्त पर्यावरण संवर्धन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सर्वश्री पत्रकार हाजी अल्ताफ शेख, संजय राऊत, हरीश मोटघरे, रवी सपाटे, महेंद्र बिसेन, महेंद्र माने, सुरेश येळे, नवीन अग्रवाल, दिलीप पारधी, मोहन पवार, बाबाभाई शेख, अमित गुप्ता, नवीन दहिकर, सुनील कावळे, साहिल भावडकर यांच्या सहयोगाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप लांजेवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय राऊत यांनी मानले.








